‘प्र’च्या कविता

Thursday 3 February 2011

माफ कर



आणि सांगीतलंच कोणी तुला की
राहतात ह्या शहरात माणसं तर
उदार मनानं माफ कर त्याला.
असेल तो एखादा वेडा किंवा
आत्ममग्न विचारवंत किंवा
जुन्या आठवणींतच फसलेला बिच्चारा.
कळत नाही अशांना ते काय बोलतात ते.
तू मात्र स्वतःला फसवून घेऊ नकोस
असल्या भ्रामक कल्पनांमध्ये.
नीट डोळे उघडे ठेवून बघशील तर
जाणवेलंच तुला ही की,
आत्मा हरवलेली, माणूसकीचा सेंट फवारलेली,
माणूस-सदृष्य जीवंत मुडदी किंवा यांत्रिक माणसेच
फिरताहेत इथे सर्वत्र, झोकात,
माणसं असल्यासारखिच, आपल्याच नादात,
बिच्चारी.
माफ कर त्यांनाही.
आणि हो. उगाच वेळ फुकट घालवू नकोस तुझा तिथं
जे कधीच मिळणार नाही त्याचा शोध घेण्यात.
पुस्तकात असतील ढीगभर पुरावे,
पण म्हणून काय आता डायनासारस्
थोडीच दिसणार आहेत तुला?
माणसांचंही असंच झालंय मित्रा.
कधी काळी असतीलही.
तो काळ आता नाही हे नक्की.
तेव्हा निमूट माघारा ये.

No comments:

Post a Comment