‘प्र’च्या कविता

Sunday, 30 January 2011

उदारता

आणि मोठ्या उदारपणे
ते म्हणाले,” जा. केलं तुला मोकळं.
दिली परवाणगी, हवं ते करायला.
आता फुलू दे तुझ्या ओठांवरची गाणी.
उसळू दे तुझ्या डोळ्यांत सृजनाचं पाणी.
झेप घेऊदे तुझ्या इच्छांना,
कर उन्मुक्तपणे अभिव्यक्त
तुझ्या भावनांना.
निर्माण कर नवी सृष्टी,
तुला हवी तिथे, हवी तशी.
तुडवत जा अज्ञात पायवाटा,
वा तयार कर नव्या तुझ्या तुच.
जग अभिमानानं, स्वाभीमानानं.”
आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या,
केला जयजयकार त्यांचा.
आणि मी आक्रंदलो,” अरे पण हे सांगण्याआधी,
त्यांनी माझी जीभ कापली,
डोळे फोडले,
हात तोडले,
पाय मोडले,
त्याचं काय?
त्याचं काय?

Thursday, 27 January 2011

काही तरी

काही तरी बिघडले आहे
नको ते घडले आहे.
उगाच नाही शब्दांना
घाण येत अनर्थाची
कारण नसतो स्पर्शांना
ओल येत संकोचाची.
मुळातंच काही विस्कटले आहे
हवे तेच निसटले आहे.
डोळ्यांमध्ये कुणास ठाऊक
तरळते झांक हिंस्त्रपणाची
मौनामध्ये कशास ठाऊक
गाज उठते क्रौर्याची.
बाहेर नाही आतंच चुकते आहे
कळत नाही पण खुपते आहे.
हास्य बघवत नाही
खळी खुलत नाही गालांची
गंध सोसवत नाही
आठवण येत नाही फुलांची.
नक्कीच काही सडले आहे
भेसूर काही मनी दडले आहे.
हात शिवशिवतात आताशा
वाट बघतात मोडण्याची
मनात चालते ठाकठूक
बरे सारे तोडण्याची.
काही तरी बिघडले आहे
नको ते घडले आहे.

Tuesday, 25 January 2011

शाळेत शिकलो होतो


शाळेत शिकलो होतो
अ – अननसाचा , आ – आईचा
आता भोगतोय
अ – अपयशाचा, आ – आसवांचा
शाळेत शिकलो होतो
२+२ = ४, १०/२= ५, ३x३= ९, ७-६= १
आता कळतंय
आयुष्यात नेहमीच बेरजा घडत नसतात
माणसं एकत्र येऊनही, एकत्र राहूनही
एक होत नाहीत
समांतर धावत असलेल्या रेषांसारखी
आयुष्यभर अंतर राखूनंच वागतात
आता कळतंय
भागाकार नसतो नेहमीच तोट्याचा,
जेवढं दुःख भागून द्यावं, ते कमी होत जातं
जेवढं सुख भागून द्यावं, ते वाढत जातं
असलं अद्भूतही घडतं
आता कळतंय
शाळेत शिकलो होतो
हायड्रोजन आणि आक्सिजन हे ज्वालाग्राही पदार्थ
मिळून पाणी तयार होतं.
आता उमजतंय पाणीही ज्वालाग्राहीच असतं.
शाळेत शिकलो होतो
राजे आग्र्याहून पेटा-यात बसून पळाले होते
औरंगजेबाच्या तावडीतून
आजही अभिमान वाटतो त्याचा
अन् आमचीही सुरू असते रोजचीच पळापळ
कधी कर्तव्यातून
कधी जबाबदारीतून
ज्याची लाज न वाटण्याइतपत कोडगेपणाही
आता मुरलाय आमच्यात सवयीनं.
शाळेत म्हणायचो प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे,
सारे भारतिय माझे बांधव आहेत,
आताही म्हणतोच पण जरा वेगळ्या सुरात.
भारत माझा देश आहे?
सारे भारतिय माझे बांधव आहेत?
शाळेत शिकलेलं सारंच खरं नव्हतं
पण निदान ते असह्य नव्हतं.
आता दररोज नव्यानं शिकताना
जुन्या गृहीतिकांची, सिद्धांतांची, तत्वांची
चिरफाड होताना
दररोज परिस्थितीपुढे
आपला कोंबडा होताना
आपलेच गुरूजन
आपल्यावरच चढताना
आपलेच देशबंधू
आपल्यालाच नाकारताना
आपल्याच देशात
शरणार्थ्यासारखं जगताना
आयुष्यात कधीकाळी शाळेत काही शिकलो होतो
असं म्हणायची हिम्मत होत नाही
आम्ही अजूनही आहोत निरक्षरंच
आणि दररोज आयुष्याच्या शाळेत
नव्या गोष्टी शिकताना जाणवतं की
यापुढेही राहू असेच
निरक्षर निरंतर.

Friday, 21 January 2011

तिच्या मनाच्या अवकाशात

कधी तिच्या मनाच्या अवकाशात,
तारा होऊन कोसळतो,
नष्ट होतो, मिसळतो,
तिच्या असीम अस्तित्वात,
तिचाच होऊन एक अंश,
पुन्हा ज्वालामुखी होऊन उसळतो,
तिच्या मनाच्या अवकाशात...

कधी तिच्या डोळ्यांत खोल,
बरसतो होऊन वादळाची वेल,
कडकडतो होऊन मेघांचे ढोल,
तडतडतो होऊन विजांचा सल,
भरून येतो कधी, कधी होतो अबोल,
तिच्या डोळ्यांत खोल...

कधी बसतो तिच्या पुढ्यात,
तिचीच सावली होऊन,
तिच्या गंधानं धूंद होऊन,
तिच्या स्पर्शानं वेडा होऊन,
तिला बघण्यासाठी आरसा होऊन,
स्वतःला विसरून, ‘तिच’ होऊन बसतो,
तिच्या पुढ्यात...

कधी ठरवतो सांगायचं तिला,
माझं काहीच ठरत नाही तुझ्यावाचून,
मन दुर जात नाही तुझ्यापासून,
डोळे हटत नाही तुझ्यावरून,
विचार निघत नाही तुझ्यातून,
जगणं कठीण केलंस तुझ्यावाचून,
ठरवतो ( फक्त ) सांगायचं तिला...

Monday, 17 January 2011

घरटे

बांधावे घरटे असे, झाड उरले नाही
पक्षी गेले दिगंतरा, पंखही उरले नाही.

उन्हात आता सावलीची, खात्री कोण देणार?
या पावसात भूमीत, एकही बीज मुरले नाही.

शब्द बंदिवान झाले, अन् अर्थ बेईमान
ओठांवरती कधीचे, गीत स्फुरले नाही.

तू जाता निघून, गावाचे स्मशान झाले
कोण म्हणतो तुझ्यासाठी, कोणीच झुरले नाही.

Sunday, 16 January 2011

धुके

हे धुके तुझ्या आठवणींचे
की स्वप्न वितळले आहे
मी चालत जातो रस्ता
मन जिथे गुंतले आहे.

हे लक्ष लक्ष दवबिंदू
की आसवे तू ढाळलेली
गुंफून पुन्हा ती सारी
मी पापण्यांत माळलेली.

हे अभ्र शुभ्र रूपेरी
की निश्वास तू टाकलेले
ही गडद वेदना घाली
गारूड मनावर काजळलेले.

हे दिवस पानगळीचे
की सोहळे निरोपाचे
वियोगव्यथांच्या वेली
झाकोळी मांडव हुरूपाचे.

Tuesday, 4 January 2011

माझ्यात वसतोय आणखी

माझ्यात वसतोय आणखी
एक मी अनोळखी
पूर्ण भिन्न
करतो मला विषण्ण.
अंधाराची मला आवड
त्याला उजेडाची ओढ
सरळ वाटेचा मी पथीक
त्याला अज्ञात रस्त्यांची ओढ.
सरपटणारा मी कीडा
त्याची गरूड भरारी
तो सागरतळ ढुंढणारा
मी भयग्रस्त उभा किनारी.
मला भय शब्दांचे
त्याला कवितेचा लळा
नक्षत्रांचा तो वासी
माझ्या पावली धुरळा.
आता वाटे त्याची मला
क्षणोक्षणी रोज भीति
जाब त्याला विचारावा
अशी नाही माझी छाती.
माझ्या पाठीवर कसे
फुलपाखरांचे पंख
जीवा बसतात रोज
मखमली डंख.
कसे आले हे डोळ्यांत
चांदणे अलौकीकाचे
त्यात तसू तसू वितळे
माझे अंग पार्थिवाचे.
त्याची उष्ण-ओली धग
नसानसांत भिणते
त्या आसक्त ओढीत
गात्र गात्र शिणते.
त्याची जिद्द आहे मला
माझ्यातून ओढायचे
कोरी करण्यास पाटी
सारे आयुष्य खोडायचे.
दावा साधेलंच तो
मला गाठून एकांती
श्राद्ध घालूनिया माझे
त्याला मिळेल प्रशांती.

Monday, 3 January 2011

आणि हे बघ

आणि हे बघ
आपल्या जातीचा दाखला
काळजीपूर्वक जपून ठेव बरं का रे.
नाहीतर अस्पृष्यासारखंच
वागवतील सारे लोक तुला.
जरी स्वातंत्र्य मिळालं
तेव्हापासून ह्या देशात
अस्पृष्यता संपूष्टात आली
असं कोणी म्हणत असलं तरी
त्यावर विश्वास ठेवू नको
शेवटी दंतकथाच ती
तिच्यावर भरवसा कसा ठेवणार?
व्यवहाराच्या लढाईत शेवटी
तुझी जातंच मदतीला येणार.